अंजली तुपलोंढे यांच्या कुटुंबीयांचे आ. प्रशांत बंब यांनी केले सांत्वन

Foto
 गंगापूर, (प्रतिनिधी) : तालुक्यातील जामगाव येथील अंगणवाडी मदतनीस अंजली तुपलोंढे यांचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने तुपलोंढे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची दखल घेत आमदार प्रशांत बंब यांनी गुरुवारी सकाळी दहा वाजता जामगाव येथे प्रत्यक्ष भेट देऊन शोकाकुल कुटुंबीयांचे सांत्वन केले.

अंजली तुपलोंढे या जामगाव येथील अंगणवाडीत मदतनीस म्हणून नुकत्याच सेवेत रुजू झाल्या होत्या. मात्र, नोकरीचा अवघा एक महिना पूर्ण होण्यापूर्वीच २३ ऑक्टोबर रोजी झालेल्या दुर्दैवी रस्ते अपघातात त्यांचा मृत्यू झाला. अल्पावधीतच काळाने घाला घातल्याने त्यांच्या कुटुंबीयांसह गावावरही शोककळा पसरली होती. स्व. अंजली तूपलोंढे यांच्या अकाली निधनाने कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे. या कठीण प्रसंगातून सावरण्याचे बळ तूपलोंढे कुटुंबीयांना मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करून आमदार बंब यांनी स्व. अंजली कैलास तूपलोंढे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत बंब यांनी जामगाव येथे जाऊन तुपलोंढे कुटुंबीयांची भेट घेतली. कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांना धीर दिला आणि या दुःखद प्रसंगी आपण त्यांच्या पाठीशी असल्याची भावना व्यक्त केली. आमदारांच्या या भेटीमुळे दुःखात असलेल्या कुटुंबीयांना मानसिक आधार मिळाला.

यावेळी गटविकास अधिकारी सुहास वाघचौरे, भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य किशोर धनायत भाजपचे तालुकाध्यक्ष रवींद्र चव्हाण, वाल्मीक शिरसाट, नगरसेवक विजय पानकडे, प्रदीप भैय्या पाटील, भाग्येश गंगवाल यांच्यासह त्यांच्यासोबत भाजप पदाधिकारी व अंजलीचे कुटुंबीय, ग्रामस्थ उपस्थित होते.